‘उध्दव ठाकरेंनी भाजपची साथ सोडणं हाच सर्वात मोठा अपेक्षाभंग’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली, हा भाजपचा सर्वात मोठा अपेक्षाभंग होता,’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या भावना व्यक्त केल्या. विधानसभा निवडणूका एकत्र लढल्या, मात्र निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरुन २५ वर्षांची युती तोडल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा आम्ही लढलो त्यापैकी १०५ जागा आम्हाला मिळाल्या. अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत, १६४ पैकी १३० जागा पक्षाला मिळतील अशी अपेक्षा होती. तरी जनादेश आमच्याजवळ होता, मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केल्याने आम्हाला विरोधात बसावं लागलं. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला. मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केलं. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, यंदाची विधानसभा निवडणुक भाजप –
शिवसेनेने एकत्र लढविली होती. या विधानसभा निवडणुकीत जनतेने कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिले नाही, तरी महायुतीच्या सर्वात जास्त जागा आल्या होत्या. मात्र, निकालानंतर शिवसेना मुख्यमंत्री पदासोबत ५० -५० फॉर्मुल्यावर अडून बसली. शिवसेनेची हि मागणी भाजपला मान्य नव्हती. त्यामुळे शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

महिन्याभराच्या या सत्तानाट्यानंतर अखेर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येत महाविकासआघाडी या नव्या सरकारची स्थापना केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नव्या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मात्र, या संपूर्ण सत्तानाट्यात २५ वर्षाची जुनी मैत्री तुटली, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/