‘शिवशाही’ कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर ! फोटो पोस्ट करत भाजप नेत्यांनं साधला ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)
यांनी एका कॅलेंडरवरून शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. सोशल मीडियावर (Social media) कॅलेंडरचा (Calendar) फोटो पोस्ट करत त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे.

भातखळकर यांनी ट्विटरवरून शिवसेनेच्या एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टीफिकेटची गरज नाही असं असा उपरोधित टोला त्यांनी लगावला आहे.

या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर 2021 असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यात शिवसेना आणि युवा सेना असंही लिहिलं आहे. खास बात अशी की, हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजीसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. यावरूनच भातखळकरांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राचं नेमकं प्रकरण काय ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काही प्रश्न केले होते. यावेळी याला उत्तर देताना सीएम ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाही असं म्हटलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केल्यानं विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी संबंध नसल्याचा खुलासा केला होता. यानंतर आता या कॅलेंडरवरून भाजप नेते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत.