अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अनेक दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच सरकारचा चेहरा होते. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी सात मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करण्यात आले. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात होते. परंतु, मुहूर्त ठरत नव्हता. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडल्याचे वृत्त आहे. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच म्हणजे २३ अथवा २४ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. परंतु, या दोन्ही तारखा मागे पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा नवा मुहूर्त ठरल्याचे समजते. ३० तारखेला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी होऊ शकतो. दुपारी १ वाजता हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षातील मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी १३ तर काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदे येणार आहेत.

राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार ?
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने सर्वच पक्षात इच्छुक नेते, आमदार मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असून त्यावर अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पक्षाचे काही खासदार, आमदार, पदाधिकारी अजित पवारांचे नाव पुढे करून त्यांच्या नावाला पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. असे असले तरी राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, छगन भुजबळ यांचीही नावे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना नेमकी कोणती जबाबदारी मिळणार, यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे.

काँग्रेसकडून कुणाला संधी
दरम्यान, काँग्रेसच्या वाट्याला कमी मंत्रीपदे असल्याने काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी जोरदार स्पर्धा आहे. यामध्ये आता कुणाकुणाला लॉटरी लागणार हे लवकरच दिसणार आहे. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या जबाबदारीबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या दोन नेत्यांपैकी एकाकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जाबाबदारी सोपविली जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/