परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली वेगळीच शंका, नवा ट्विस्ट

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र उघड झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची आणि परमबीर सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, आता या प्रकरणाचे मुळ असलेल्या पत्रावरच मुख्यमंत्री कार्यालयाने शंका उपस्थित केल्याने एकुणच प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने पहिली प्रतिक्रिया दिली असून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परमवीर सिंह यांच्या नावाने पाठवण्यात आलेला ईमेल नक्की त्यांनीच पाठवला आहे का, याबाबतच सर्वात आधी तपास करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल अ‍ॅड्रेसवरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परमवीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या पत्रकार पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहता परमबीर सिंग यांना अधिकृतरीत्या आयपीएस अधिकार्‍यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर ते सध्या नाराज आहेत. नव्या पदावर रूजू न होता परस्पर रजेवर गेलेले परमबीर सिंग स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे दर महिन्याला शंभर कोटी रूपये गोळा करण्याची मागणी केली होती, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसेच दादरा-नगर-हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या कथित आत्महत्या प्रकरणावरूनही परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.