पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंकडून युतीवर ‘शिक्कामोर्तब’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी
युतीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राज्यात युतीचंच सरकार येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र राज्याचा विकास कऱण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार राज्यात येणार आहे. जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचं आहे.’

समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण करू
मोदी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मोदीजी मी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करु. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत. देशाच्या अस्मितेचे विषय आपण सक्षमतेने हाताळत आहात. मोदींच्या रुपाने देशाला समर्थ नेतृत्त्व मिळालं आहे. नरेंद्र मोदींनी चंद्रालाही गवसणी घातली आहे. काश्मीर अविभाज्य घटक होता, आहे आणि राहणार आणि हे नरेंद्र मोदींनी सिद्ध करुन दाखवलं आहे. कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली. उद्धव ठाकरेंनी यावेळी आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण करू असा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आज मुंबईत करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आदी उपस्थित होते.