उदयनराजेंचा ‘मोहरा’ म्हणून वापर, सामनातून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर टीका

मुबई : पोलिसनामा ऑनलाइन – उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तसेच या ठिकाणी उदयनराजेंचा फक्त वापर होत असल्याचे म्हंटले आहे.

उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना भाजपात घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल, अशा शब्दात सामनातून उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर बाण सोडण्यात आला आहे.

‘शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत अशा प्रकारचा खोचक टोला यावेळी सामनातून उदयनराजेंना मारण्यात आला आहे.

एरवी तीन चार लाखांच्या फरकाने जिंकणारे उदयनराजे भोसले हे यावेळेस दमछाक होत होत जिंकले. आरे कोण मोदी, आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाला आहे. असे म्हणणारे उदयनराजे आता दिल्लीतील लोकांच्या आदेशाने चालणार. लोकसभेला मोदींवर टीका करणाऱ्या राजेंना आता तेच मोदी शहा शिवरायांच्या विचारांचे काम आर्त असल्यासारखे वाटू लागले आहेत. अशा शब्दात उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेतून टीका करण्यात आली आहे.

You might also like