उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर ‘OSD’ बनणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवार दि 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सचिव मिलंद नार्वेकर यांची ओएसडी म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. नार्वेकरांनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली आहे.

कोण आहेत मिलिंग नार्वेकर ?
मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पहात असे. त्यांच्या परिसरातील वॉर्ड 1992 च्या महापालिका निवडणुकांआधी विभागला गेला. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळवण्यासाठी त्यांनी मातोश्री गाठली. नार्वेकरांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्यासाठी ते उद्धव यांना पहिल्यांदा भेटले.

उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की, नार्वेकर हुशार, स्मार्ट आणि बोलण्यात पटाईत आहेत. त्यांच्यातील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की, फक्त शाखाप्रमुख व्हायचं आहे की, आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद नार्वेकरांनी क्षणात उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते. तेव्हापासून अगदी सावलीप्रमाणे नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. 1994 च्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे रित्सर पीए झाले. शिवसेनेच्या अनेक कामांत त्यांचा मोठा वाटा आहे. यात संघटनेची महत्त्वाची पदे उद्धव यांच्या विश्वासून व्यक्तींकडे जातील हे पाहण्यापासून तर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार होईपर्यंत अनेक घटनांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

Visit : Policenama.com