‘खरे-खोटे’पणावरून सेना-भाजपमध्ये ‘कलगीतुरा’ ! सेनेनं दिला ‘गर्भित’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा यावरून अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे. खरे-खोटेपणावरून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांनी भाजपला 1999 ची आठवण करुन देत गर्भित इशारा दिला आहे. 1999 मध्ये भाजपचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे पुढची 15 वर्षे आघाडीचे सरकार होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हणत भाजपला एकप्रकारे इशारा दिला आहे.

1995 मध्ये राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. मात्र, 1999 मध्ये मध्यावधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळे लढूनही युतीपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर विदेशी असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली होती. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. निकालानंतर युतीचीच सत्ता असल्याने भाजपाच्या नेत्यांना आपणच सरकार स्थापन करु असा विश्वास होता. मात्र, युती सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरली आणि हीच वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साधली. या आघाडीची सत्ता राज्यात 15 वर्षे टिकली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिले. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचे सांगत जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तो पर्यंत चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी फोन का उचलले नाहीत याचेही कारण सांगत लोकसभेवेळचा अमित शहा आणि फडणवीस यांच्यासोबतचा चर्चेचा तपशील पत्रकार परिषदेत सांगितला.

Visit : Policenama.com 

 

You might also like