‘ठाकरे सरकार’कडून फेरआढावा ! सिंचन प्रकल्प भाजपवरही उलटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने आधीच्या भाजपा सरकारच्या काळातील अनेक निर्णयांवर फेरविचार सुरु केला आहे. पूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकाम कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या काळात पाच सिंचन प्रकल्पांना दिलेल्या सुधारीत प्रशासकीय मान्यतांचा फेर आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रीमंडळ बैठकीत 6 हजार 144 कोटींच्या पाच प्रकल्पांच्या सुधारीत प्रस्तावाला मान्यता दिली होती. या मान्यतासंदर्भात आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी याची चौकशी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशीचा निर्णय झाल्यास फडणवीसांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागू शकतो. या प्रकरणांची चौकशी होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जलसंधारण मंत्री असताना विविध जलसंधारण प्रकल्पांना अशाच प्रकारे सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने त्यात भ्रष्टाचार झाला, असे भाजपच्या नेत्यांनी म्हंटले होते. मात्र आता हे नवे जलसंधारण खात्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रकरण भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

सिंचनाच्या मुद्दावरूनच भाजप नेत्यांकडून सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर यांच्याविरोधात कथित सिंचन घोटाळ्याच्या सुरू असलेल्या चौकश्या थांबविण्यात आल्या.