‘ठाकरेच राज्य चालवतात, सोनिया गांधी आणि शरद पवारांचा ते सल्ला घेतात’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav-thackeray) घराबाहेर पडत नाही. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? आठ महिने झाले, त्यांनी माझ्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad-pawar) यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) लगावला होता. राज्यात देवेंद्र फडणवीस व शरद पवार हेच जनतेला सहज भेटतात, असे पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानावरुन आता शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिले आहे.

यावर उत्तर देताना मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant ) म्हणाले, उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात. तसेच शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वेळोवेळी सल्लाही घेतात, असे यांनी म्हटले आहे.

ही तर महाराष्ट्राची संस्कृती-

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्याबाबत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री घर सोडण्यास तयार नसताना शरद पवार या वयातही राज्यभर फिरत आहेत. त्याचे कौतुक केले तर काय झाले. पक्ष कोणताही असो, काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक झालेच पाहिजे. हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जाणत्या राजाला हे शोभत नाही –

घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठविले आहे. असा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लगावला आहे.