टोपीखाली जर डोकं असेल तर…! हिंदुत्वावरून ‘उद्धव ठाकरें’नी साधला ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोट्या परंतु तडाखेबाज भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत भाजपा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. ‘घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का?’ अशा प्रश्न करत तुमच्या टोपीखाली डोकं असेल तर मोहन भागवत काय म्हणाले यावर जरा विचार करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आपला भाषणातून दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…’ अशी साद घालत आपल्या भाषणाची सुरुवात केली. सर्वात आधी ते सरकारबद्दल बोलले. ते म्हणाले की, ‘पुढील महिन्यात आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होईल. जरी समोरचे तारीख पे तारीख देत असतील, त्यांना देऊ द्या. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदी बसून कारभार सुरु केला, तेव्हापासूनच बरेच लोक स्वप्न बघत आहेत की हे सरकार लवकरच पडेल. तेव्हा मी जे आव्हान दिलं होतं ते आजही देत आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,’ असं खुलं आव्हान ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे.

दरम्यान आज सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, ‘हिंदुत्व हा शब्द फक्त पुजेपुरताच मर्यादित नाही. यावरून अनेक जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भ्रम पसरविण्याचे काम केले आहे. संघाच्या दृष्टीने हिंदुत्व आपल्या देशातील अध्यात्मावर आधारित परंपरेचे सनातन सातत्य आणि मूल्यसंपदेसह अभिव्यक्ती देणारा शब्द आहे. विश्व मानवतेचा देखील त्यात अंतर्भाव आहे. स्वदेशीमधील ‘स्व’ म्हणजे हिंदुत्व आणि ‘देशी’ म्हणजे नीती होय. हिंदू हा विविधतेला स्वीकारणारा शब्द आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

हाच धागा धरत आपण सेक्युलर झालात का? अशी विचारणा करणाऱ्या राज्यपालांच्या पत्रावर आणि मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करणाऱ्या भाजपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले, मोहन भागवत यांनी सकाळी देशाला उद्देशून हिंदीतून एक भाषण केलं. ‘हिंदू, हिंदुत्त्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’ हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. त्यामुळे जे त्यांना मानतात, त्यांच्याप्रमाणेच काळी टोपी घालतात. त्या टोपीखाली जर डोकं असेल तर विचार करा, असं हिंदुत्व तुम्हाला पटतं का? अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. मोहन भागवतांकडून जरा हिंदुत्व शिकून घ्या, असा सल्ला देत देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नसून बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व आहे, असं ठाकरे म्हणाले. तुमचं हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व यात मोठी तफावत असल्याचं सांगत ‘इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता’ असले धोरण तुमचं आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

You might also like