शाळेला दांडी मारण्यासाठी उद्धव ठाकरे लढवायचे ‘ही’ शक्कल

मुंबई : वृत्तसंस्था – नुकतीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेमातीला दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.  बाळासाहेबांची ९३ वी जयंतीही जवळ आली आहे. याच निमित्ताने दोन दिवासत (२० जानेवारी) कलर्स टीव्ही वाहिनीवर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मानाचा मुजरा’ या विशेष कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमाचा टीझर कलर्स टीव्हीने फेसबुकवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांबद्दलची एक आठवण सांगितली आहे. २५ जानेवारी रोजी ठाकरे हा  सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मुलाखतीत शाळेच्या प्रगतीपुस्तकावर खुद्द बाळासाहेबच सही करायचे हे सांगतानाच उद्धव ठाकरेंनी आणखी एक मजेदार किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे शाळेला दांडी मारायची असल्यास काय उपाय करायचे हे त्यांनी सांगितले उद्धव ठाकरे म्हणाले की, “ज्यावेळेला कधी शाळेला दांडी मारायची असेल त्यावेळेला सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे साहेबांना जाऊन मिठी मारुन बसायचं.” उद्धव ठाकरेंच्या या वाक्यावर सभागृहात अनेकांना हसू फुटले. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “अशी मिठी मारल्यावर ते माँ साहेबांना सांगायचे, जाऊ दे ना आता, उद्या बघू.”

‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.  गाडगीळ यांनी उद्धव यांना ‘तुमच्या शाळेच्या प्रगतीपुस्तकावर खुद्द बाळासाहेब सही करत असतं की माँ साहेब?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उद्धव यांनी उत्तर देताना, ‘साहेबच सही करायचे’ असं उत्तर दिलं. पण या उत्तराबरोबरच त्यांनी लहानपणीची ही खास आठवणही सांगितली.

राज ठाकरेंच्या प्रगतीपुस्तकावरही बाळासाहेबांची सही

बालदिनानिमित्त एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  राज ठाकरेंनीदेखील आपल्या लहानपणीच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला होता. यावेळी बोलताना त्यांनीही त्यांच्या चौथीनंतरच्या प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही होती असं सांगितलं होतं.