CM ठाकरेंच्या शिक्षिकेची विनंती, म्हणाल्या – ‘उद्धव बेटा, वृध्दाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित कर, जेणेकरून आम्हाला रात्री नीट झोपता येईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसला आहे. या चक्रीवादळाने वसईतल्या वृद्धाश्रमाचेही छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे राहतात. या शिक्षिकेनेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम व्यवस्थित करण्याची विनंती केली आहे. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती रणदिवे यांनी केली आहे.

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (वय 88) या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत असत. एका वृत्तानुसार, राजेश आणि सरिता मोरु हे वृद्धाश्रम चालवतात. या पावसात वृद्धाश्रमतील वृद्धांचे बेड्स भिजले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपता येत नाही. रणदिवे यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे हे वृद्धाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित करावे, जेणेकरून आम्हाला रात्री शांतपणे झोपता येईल, अशी विनंती रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या वर्षी रणदिवे या वृद्धाश्रमात आल्याचे राजेश मोरु यांनी सांगितले. त्यांच्या पतीचे 2014 साली निधन झाले आहे. माझ्या मुलाचं वयाच्या पहिल्या वर्षी निधन झाल्याचे रणदिवेंनी सांगितलं. वृद्धाश्रमात त्यांना टीचर म्हणून अशी हाक मारतात.