मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचे ‘दर्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शनिवारी अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत, त्यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेऊन यावेळी होणारी शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्याची राष्ट्रीय पातळीवर मोठी दखल घेण्यात आली होती.

मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ केल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या दौर्‍याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे ह आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अयोध्येत पोहचणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्याबरोबर रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे ही असणार आहेत.

ठाकरे यांच्या या दौर्‍यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरातील शिवसैनिक अयोध्येत पोहचत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहेत त्यानिमित्ताने ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा आहे. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.