मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ! उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग ‘मोकळा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने कहर केला आहे. अशातच सर्व यात्रा, सण, उत्सव रद्द करण्यात आले आहेत त्याचबरोबर निवडणूक आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक देखील पुढे ढकली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी ए. एन. आय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकली गेल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याचा फटका बसणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू होती कारण घटनेतील १६४ (४) कलमानुसार, विधिमंडळाचा सदस्य नसलेल्याला सहा महिन्यांत सदस्य होणे बंधनकारक असते. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ मे पूर्वी सदस्य होणे आवश्यक आहे.

विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या करोनाच्या संकटाबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होणं आवश्यक होतं. गुरूवारी (९ एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे.

राज्यात कोरोनाचे नवे १६२ रुग्ण, एकूण संख्या १२९७ वर
दरम्यान, एकीकडे राज्य सरकारकडून कृती कार्यक्रम राबवला जात असताना करोनाच्या प्रसाराचा वेग कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गुरूवारी १६२ जणांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.