‘ठाकरे सरकार’च्या एका निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीआधी अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कोणत्याना कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता भाजपचेच सरकार गेल्याने अशा नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, विनय कोरे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि कल्याणराव काळे यांना फडणवीस सरकारने कारखान्यासाठी दिलेली ३१० कोटींची बँक हमी ठाकरे सरकारने रद्द केली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेच्या निवडणुकीआधी दिलेली हमी ठाकरे सरकारने राज्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणून रद्द केली आहे. तसेच सध्या मोदी सरकारचा महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प देखील सध्या महाविकास आघाडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये आलेल्या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी मदत दिली होती. पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा तात्यासाहेब कोरे साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना बँक हमी देण्यात आली होती.

उद्धव ठाकरे सरकारने भाजपने सुरु केलेल्या प्रकल्पांबाबत स्पष्टीकरण देताना कोणतेही प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खरंच ज्या प्रकल्पांची आवश्यकता आहे असे प्रकल्प सुरु राहणार असल्याचे ठाकरे सरकारकडून सांगण्यात आले आहे.