उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ ४ फाईल्स ED च्या कार्यालयात पडून : नारायण राणे

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घणाघाती आरोप केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या चार फाईल्स ईडीच्या कार्यालयात पडून आहेत. त्याची चौकशी सुरू आहे की नाही हे माहीत नाही. असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. याचदरम्यान, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, मी शिवसेनेच्या भ्रष्टाचार वर बोललो म्हणून शिवसेना मला टोकाचा विरोध करते. अनेकांनी शिवसेना सोडली मलाच विरोध होतो. शिवसेना सोडतना उध्दव ठाकरेवर भ्रष्टाचारांचे आरोप केला म्हणून शिवसेनेतून माझ्यावर टीका होते. असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, माझी इडीकडून कोणतीही चौकशी सुरू नाही. तसेच मी कोणत्याही बोगस कंपन्या स्थापन केलेल्या नाहीत. मात्र उध्दव ठाकरेच्या चार फाईल ईडीच्या कार्यालयात पडून आहेत. पण त्यांची चौकशी सुरू आहे का माहीत नाही. असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेत पैसे देऊन तिकीटवाटप होते

मी शिवसेनेत असतांना वेंगुर्ले येथील विधानसभेचे तिकिट बदलून पुष्कराज कोले यांना द्यायचे होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी  त्यासाठी एक कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यावेळी ही बाब मी बाळासाहेबांच्या कानावर घातली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी तिकिट बदलून कांबळीना तिकिट देण्यास भाग पाडले. उद्धव ठाकरे यांना याच गोष्टीचा राग आला होता. तोच राग ते माझ्यावर काढत आहेत, असेही त्यांनी म्हटले.