पंढरपुरात सोमवारी उद्धव ठाकरेंची महासभा, शिवसेनेची जय्यत तयारी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा देत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची अयोध्यानंतर पंढरपुरात सभा होणार आहे. सोमवारी म्हणजे २४ तारखेला  येथील कॉलेज रोडवरील चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानात दुपारी सभा होणार आहे. या सभेसाठी जागोजागी लावण्यात आलेले भगवे झेंडे, स्वागत कमानींमुळे पंढरी नगरी भगवीमय झाली आहे.

या सभेच्या तयारीसाठी सेनेचे खासदार संजय राउत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आदींसह पक्षाचे अनेक खासदार, आमदार पंढरीत दाखल झाले आहेत. सोमवारी ठाकरे यांची दुपारी सभा आणि त्यानंतर सायंकाळी चंद्रभागा नदीवर आरती होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे.

राम मंदिर हा मुद्दा घेवून अयोध्येतील सभेनंतर राज्यात पंढरपूर येथे शिवसेनेने सभेचे आयोजन केले आहे. राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करणे हा विचार घेवून सोमवारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पुणे-पंढरपूर रस्त्यावरील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाजवळील चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून या सभेला जवळपास ५ लाख शिवसैनिक येतील असा अंदाज पक्षाने केला आहे.

तर दुसरीकडे शहरात २०० स्वागत कमानी, १० हजार झेंडे, २०० डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यासाठी सुमारे १ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. सोमवारी सभा झाल्यावर चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील इस्कॉन मंदिराने बांधलेल्या घाटावरून उद्धव ठाकरे नदीची आरती करणार आहेत.

राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. चंद्रभागेचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसंच नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही कदम यांनी यावेळी दिली.