मुख्यमंत्री ठाकरेंचा यू टर्न, महाविकास आघाडी सरकार चालवतय कोण ? शिवसेना मुखपत्रातूनच ‘पोलखोल’ उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आपल्यापासून विरोधक त्यांना लक्ष्य करत आहेत. शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला सत्तेत येता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजप कायमच आक्रमक पाहायला मिळते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लीम आरक्षणावरुन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करु अथवा अध्यादेश काढू अशी भूमिका सभागृहात मांडली. मंत्र्यांकडून सभागृहात मांडलेली भूमिका अधिकृत कामकाजाचा भाग मानला जातो. नवाब मलिक यांची हीच भूमिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मांडण्यात आली.

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण, ‘राज्य सरकारचा निर्णय’ या मथळ्याखाली सामनामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु मंगळवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका वेगळी होती. उद्धव ठाकरेंनी सांगितले की, मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, त्यामुळे यावर भूमिका मांडण्याचा प्रश्नच नाही. ज्यावेळी हा मुद्दा माझ्यासमोर येईल तेव्हा मी यावर माझी भूमिका मांडेल.

परंतु यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुस्लीम आरक्षण मुद्द्यावरुन भाजपने ट्विटरवर पोस्ट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये सामनातील वृत्ताचा फोटो झोडण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा यू टर्न असे सांगत, चार दिवसांपूर्वीच सामनामध्ये आलेली बातमी आणि आजची बातमी याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने काय घ्यायचा? राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारता निर्णय घोषित करतात का? नक्की हे सरकार चालवतंय कोण असे प्रश्न यातून उपस्थित करण्यात आले.

सामना बद्दल काय बोलले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –
सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामना शिवसेना आणि ठाकरे हे कधी वेगळं होऊ शकत नाही. संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. अनेकदा शिवसेनाचा पक्षप्रमुख म्हणून माझी भूमिका, माझे मुद्दे, विचार सामनातून येत असतात, ते येतच राहतील असे त्यांनी सांगितले होते.

यामुळे उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका आणि सामना वृत्तपत्रातून छापून आलेल्या दोन बातम्या यामुळे भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे येत्या काळातच कळेल.