‘गेली 5 वर्ष सोबत आहोत आणि पुढेही असणार आहोत’, उध्दव ठाकरेंकडून युतीबाबतच्या ‘उलट-सुलट’ चर्चांना ‘फुलस्टॉप’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जागा वाटपावर सध्या पेच निर्माण झाला असताना उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 2014 मध्ये युती नव्हती. आधी खूप कामं केली आहेत आताही करतोय आता तर फक्त शिवसेना नाही तर भाजपा देखील सोबत आहे. कारण 2014 च्या निवडणूकीत आमची युती नव्हती आम्ही गेली पाच वर्षे सोबत आहोत आताही आहोत आणि पुढे असणार आहोत असं भाष्य करुन युतीबाबत सुरु असलेल्या उलटसुटल चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. भाजपला थोड्या जास्त जागा पाहिजे आहेत तर शिवसेना 50 : 50 टक्क्यांचा फॉर्म्युलावर आडून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तोडगा कसा निघणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार हे आता निश्चित झाले आहे.

युती होणार की नाही यावर पडदा पडला असला तरी कोणता पक्ष किती जागा लढणार यावर घोडं अडल्याचे स्पष्ट झाले आहे. ताकद वाढल्याने भाजपने यावेळी जास्त जागांची मागणी केली आहे. तर जागावाटप समसमान व्हावे असे शिवसेनेला वाटत आहे. पण यावर तोडगा कढून आठवड्यात जागावाटपाची घोषणा होईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते.