×
Homeराष्ट्रीयउदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले - 'मोदींच्या छळामुळे जेटली आणि स्वराज...

उदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘मोदींच्या छळामुळे जेटली आणि स्वराज यांचा मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. मोदींच्या छळामुळेच भाजपनेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हंटले आहे त्याचबरोबर वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला सारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात असल्याची टीका केली होती. त्याला स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार एका सभेला संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय वैंकय्या नायडूंसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पंतप्रधान बाजूला सारत असल्याचं म्हटलं आहे. मिस्टर मोदी, तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे, असं ते म्हणाले.

उदयनिधी स्टॅलिन यांच्या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. निवडणुकीसाठी आपल्या आईच्या नावाचा वापर करू नये असे बांसुरी यांनी ट्विट करून सांगितले.

त्या म्हणाल्या की, उदयनिधीजी आपण केलेल वक्तव्य चुकीचे आहे. तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर करु नका. माझ्या आईला नेहमी मोदींनी आदर आणि सन्मान दिला. पंतप्रधान आणि पक्ष कठीण काळात आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत असे त्यांनी म्हंटले आहे.

इंडिया टुडेशी बोलताना बांसुरी स्वराज म्हणाल्या की, निवडणूक राजकीय मुद्दयांवर लढवायची असते. मात्र उदयनिधीजी आणि अरुण जेटलींच्या नावाचा वापर करत पंतप्रधानांवर हल्ला करत आहेत याचं आश्चर्य वाटतं आहे. त्यांचे वक्तव्य अनादर करणारे असल्याचे त्यांनी म्हंटले.

दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही उदयनिधी यांना खडे बोल सुनावले आहे त्या म्हणाल्या कि उदयनिधीजी निवडणुकीचा तुमच्यावर दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांच्यामध्ये केवळ राजकारणाचेच नाही तर त्यापलीकडचे संबंध होते. ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते.

मोदी सरकारमधील सुषमा स्वराज आणि अरुण जेटली महत्वाचे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारचाही ते भाग होते. २०१९ लोकसभा निवडणुकीतून प्रकृतीच्या कारणास्तव दोघांनीही माघार घेतली होती. सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झालं. तर २४ ऑगस्ट २०१९ ला अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

Must Read
Related News