‘नालायक’ माणूस संसदेत पोहोचू नये ; उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर जहरी टीका

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नेते कोणत्याही थराला जाऊन टीका करू लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारेंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा ‘नालायक’ माणूस संसदेत पोचता कामा नये, अशा शब्दात एकेरी उल्लेख केला आहे. तसंच मागील वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींना पाठींबा दिला, ही माझी चूक होती, असंही त्यांनी म्हटलं. हातकणंगले येथील युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपूर येथे सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचं साहित्य वाचा. मराठी समजत नसेल तर इटलीच्या भाषेत लिहून घेऊन भाषण करा. ही इटली नाही भारत आहे. वीर सावरकरांनी देशासाठी जे कष्ट भोगलंय तसं कष्ट जर नेहरूंनी भोगलं असतं तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली आग पाखड केली.

तसंच हातकणंगलेच्या जागेवर बोलताना मागील वेळी चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. पण ती माझी चूक आता तुम्ही जनतेने सुधारायची आहे, असं म्हणत त्यांनी राजू शेट्टींवर टीका केली.

दरम्यान, या सभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनीही राजू शेट्टींवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राजू शेट्टींना पाडायला भाजप- सेनेची गरज नाही, त्यांना पाडायला शरद पवार पुरेसे आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.