सोलापूर : उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे आरक्षण फुल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्वच स्थानकांवर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सोलापूर विभागातून धावणारी उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे आरक्षण फुल (udyan-golgumbaj-and-siddheshwar-express-tickets-are-full) झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कर्नाटक, आंध्र प्रदेश, मराठवाड्याला जोडणारे व मध्य रेल्वेचा सर्वांत महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूरला ओळखले जाते. दिवाळीनिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या हाउसफुल धावत आहेत. सोलापूरमार्गे म्हैसूरला जाणारी गोलगुंबज एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रवाशांची गर्दी आहे. याशिवाय मुंबईहून बेेंगलोरला जाणारी उद्यान एक्स्प्रेस व सोलापूर ते मुंबई नियमित धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस च्या सर्वच सीटचे आरक्षण फुल आहे. तसेच बेंगलोरमार्गे नवी दिल्ली धावणारी कर्नाटक एक्स्प्रेस व गदगहून मुंबईला जाणारी गदग एक्स्प्रेस , हैद्राबादहून मुंबईला जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेस गाडीलाही गर्दी होत आहे. दरम्यान दिवाळीमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. गाडी क्रमांक- 02031-02032 पुणे-गोरखपूर-पुणे फेस्टिव्हल गाडी 23 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.