‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची ओळख असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोना व्हायरसच्या संकटाचे सावट आहे. त्यामुळेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशगल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लाखो लोक गणेश गल्लीत दर्शनासाठी येत असतात. कोरोना व्हायरसने लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम केला आहे. त्यामुळे मंडळयाच्या पदाधिकार्‍यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आम्हाला नागरिकांवर वर्गणीचा भार टाकायचा नाही.

त्यामुळेच यंदा आम्ही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतलाय असे मंडळाच्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. मंडळाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून मुंबई रेड झोनमध्ये आहे. मागच्या 40 दिवसांपासून अनेक दुकाने, व्यवसाय बंद आहेत. लोकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.