1500 रुपयांची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दीड हजार रुपयांचा हप्ता स्वरूपात लाच स्विकारणाऱ्या तहसील कार्य़ालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) तहसील कार्य़ालयात करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. रविंद्र विनायक तारकस (वय-५७ रा. हकीमी कॉम्प्लेक्स, भुसावळ) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील ५२ वर्षीय तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली आहे.  तक्रारदार यांचे स्वस्त धान्य दुकान असून दरहमहा ५०० हप्त्याप्रमाणे तीन महिन्याचे दीड हजार रुपयांची लाचेची मागणी रविंद्र तारकस याने केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने पंचासमक्ष पडताळणी  केली. त्यावेळी रविंद्र याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सापळा रचून रविंद्र याला दीड हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक जी.एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त