पुणे, पिंपरी चोरट्यांचा कोल्हापूरातील सराफ दुकानावर डल्ला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरातील महाद्वार रोड व गुजरी परिसरात दोन सराफी दुकाने फोडून चोरट्यांनी २२ लाख रुपये किंमतीचे ६० तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. प्रमोद कोलेकर यांच्या दुकानातून पळवून नेलेली तिजोरी मिरज फाटा येथे रस्त्याच्या कडेला रिकामी सापडली. हा गुन्हा पुणे, पिंपरी येथील चोरट्यांनी केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुन्हा करण्यासाठी चोरट्यांनी शाहुपूरी येथून व्हॅन चोरुन तिचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. गुजरीतील दरोड्याचा तपास करताना तिघे चोरटे व्हॅनमधून आल्याचे रोडवरील एका दूकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. कोलेकर सराफ यांच्या दूकानातील दागिन्यांची तिजोरी चोरट्यांनी लंपास केली होती. तिजोरीत सुमारे १८ लाख किंमतीचे दागिने होते. व्हॅनचा शोध घेतला असता चोरट्यांनी शाहूपुरी येथील एका घरासमोरुन चोरी करुन ते गुजरीत आले होते.

गुजरी येथून चोरटे स्टेशन रोडने सांगली फाटा येथून मिरजेकडे गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता रिकामी तिजोरी पोलिसांना सापडली. महार्गाच्या दिशेने चोरटे निघून गेल्याने ते पुणे-पिंपरी येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. या परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांची पोलीस माहिती घेत आहेत.