‘…तर कंगनाला त्वरीत अटक करण्याचे मुंबई पोलिसांना अधिकार’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या विरुद्ध खासगी फौजदारी खटला दाखल होता. त्या अनुषंगानं प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात जर कंगना रणौत पोलिसांना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल असं मत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केलंय.

जळगावात आपल्या निवासस्थांनी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना निकम म्हणाले, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना रणौताल 2 वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी कंगनाला तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. जर कंगनानं या समन्सचं उल्लंघन केलं तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल (Non-Bailable – अजामीनपात्र) किंवा बेलेबल (Bailable – जामीनपात्र) वॉरंट मागू शकतात. यामुळं पोलिसांना पुढील चौकशीसाठी मदत होऊ शकते.

पुढं बोलताना निकम म्हणाले, इतकंच नाही तर यासाठी पोलीस तिला त्वरीत अटक करू शकतात. मुंबई पोलीस अ‍ॅक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात असंही त्यांनी सांगितलं.

कंगनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजद्रोहाच्या आरोपावरून समन्स बजावलं होतं. यानुसार कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचं होतं. परंतु भावाच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहे असं सांगत तिनं मुंबईला येणं टाळलं. यानंतर पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. त्यांना 10 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा भावाच्या लग्नाचं कारण देत तिनं पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं टाळलं होतं.

कंगनाच्या भावाचं लग्न 10 नोव्हेंबर रोजीच होतं. रणौत बहिणींचं म्हणणं आहे की, भावाचं लग्न झाल्यानंतरच आम्हाला मुंबईला येणं शक्य होणार आहे. कंगनाला राजद्रोहाच्या आरोपावरून समन्स बजावण्यात आलं आहे. तिनं महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई बद्दल चुकीच्या शब्दात मत प्रदर्शित केलं होतं.

येत्या 23 नोव्हेंबर रोजी कंगनाला तर 24 नोव्हेंबर रोजी रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता यावर कंगना आणि रंगोली नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिला समन्स – 26 आणि 27 ऑक्टोबर
दुसरा समन्स – 9 आणि 10 नोव्हेंबर
तिसरा समन्स – 23 आणि 24 नोव्हेंबर