अमेरिकेच्या चेहर्‍यावर 3 देशांकडून ‘चपराक’, US त्यास पात्र : चीन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे की, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सने अमेरिकेला थप्पड लगावली आहे आणि अमेरिका त्यास पात्र आहे. वस्तुतः ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी करत इराणवर पुन्हा बंदी घालण्याच्या अमेरिकेच्या योजनेला नकार दिला होता.

चिनी वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, 2003 च्या इराक युद्धा नंतरची ही सर्वात विशेष परिस्थिती आहे जेव्हा अमेरिकेला त्याच्या युरोपियन सहयोगी देशांनी ‘नाही’ म्हटले आहे. यामुळे इराणच्या मुद्यावर अमेरिका एकटा पडला आहे.

संयुक्त राष्ट्रांनी इराणवर लादलेली बंदी 18 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. अमेरिकेने पुन्हा संयुक्त राष्ट्रात इराणवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु त्याला केवळ एक देश डोमिनिकाचा पाठिंबा मिळाला.

मे 2018 मध्ये इराणबरोबर झालेल्या न्यूक्लियर करारातून अमेरिका वेगळा झाला होता. चीनचे म्हणणे आहे की, यामुळे अमेरिकेला इराणवर बंदी घालण्याचा अधिकार नाही, परंतु अमेरिका गुंडगिरीप्रमाणे वागत आहे.

चीनचे म्हणणे आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या न्यूक्लियर करारातून अमेरिका विभक्त करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे युरोपच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे कारण इराण युरोपच्या जवळ आहे. तसेच, इराणशी युरोपियन व्यवसायाचे हितसंबंधही जोडले आहेत.