Coronavirus : ब्रिटनमध्ये 1 लाखांहून अधिक जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यु

लंडन : लसीकरण वितरणासा गती देण्यासाठी व व्हायरसचे रुपांतर कमी करण्यासाठी ब्रिटन सरकार प्रयत्न करत असतानाच कोरोनामुळे ब्रिटनमधील मृत्यु झालेल्यांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. मंगळवारी एका दिवसात १ हजार ६३१ जणांना मृत्यु झाला. आतापर्यंत गेल्या १० महिन्यात २० जानेवारी २१ रोजी सर्वाधिक १ हजार ८२० जणांचा मृत्यु झाला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर जेवढे रुग्ण आढळून येत नव्हते, त्यापेक्षा आता दिवसेंदिवस अधिक रुग्ण आढळून येत असून मृत्युच्या संख्येतही वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३६ लाख ८९ हजार ७४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १६ लाख ६२ हजार ४८४ जण कोरोनातून मुक्त झाले आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये सध्या १९ लाख २२ हजार ९०८ रुग्ण सक्रीय आहेत. अमेरिकेपाठोपाठ सध्या ब्रिटनमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

डिसेंबरमध्ये फायझरच्या कोविड १९ लसीला ब्रिटनने सर्वात प्रथम मान्यता दिली आहे. आतापर्यंत ६८ लाख ५३ हजारांहून अधिकांनी पहिला डोस घेतला असून ४ लाख ७२ हजारांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ जानेवारीपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.