अनेक ‘लक्झरी’ कार, ‘खासगी’ विमान मग कशामुळं ‘कंगाल’ झाले अनिल अंबानी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2008 ची गोष्ट आहे, श्रीमंतांच्या संपत्तीची आकडेवारी देणार्‍या फोर्ब्स मॅगझीनने अनिल अंबानी यांना जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती म्हटले होते. हे ते वर्ष आहे ज्यात बहुतांश लोकांना वाटत होते की, अनिल अंबानी यांनी उद्योग जगतात आपले भक्कम पाय रोवले आहेत.

मात्र त्याच वर्षी अनिल अंबानी यांच्या अधोगतीला सुरूवात झाली. आज परिस्थिती अशी आहे की, अनिल अंबानी यांच्याकडे लग्जरी कार्स, प्रायव्हेट जेट आणि यॉट तर आहे. पण त्यांचे एकुण मुल्य शून्य झाले आहे.

ब्रिटनच्या न्यायालयात अनिल अंबानी यांच्या वकीलांनी दावा केला आहे की, अनिल अंबानी यांच्याजवळ 11 पेक्षा जास्त लग्झरी कार, एक प्रायव्हेट जेट, एक यॉट आणि दक्षिण मुंबईत स्पेशल सीवींड पेंटहाऊस आहे. परंतु, नेटवर्थ झिरो आहे. अंबानी यांच्या वकीलांच्यानुसार 2012 मध्ये अंबानी यांची गुंतवणूक सात अरब डॉलरपेक्षा जास्त होती. आज ती 8.9 करोड डॉलर झाली आहे. जर त्यांची एकुण देणी पाहिली तर ही गुंतवणूक शून्य आहे.

अनिल अंबानी यांच्या अधोगतीची पूर्ण कहानी…
2002 मध्ये रिलायन्स इण्डस्ट्रीजचे फाउंडर धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर सुमारे दोन वर्षांनी अनिल अंबानी आपले भाऊ मुकेश अंबानी यांच्यापासून वेगळे झाले. या दरम्यान मुकेश अंबानी यांना ऑईल रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकलचा उद्योग मिळाला तर अनिल यांच्या वाट्याला टेलीकॉम, फायनान्स आणि एनर्जी यूनिट्स आले.

दोन्ही भावांनी एकमेकांशी स्पर्धा न करण्याच्या एका करारावर सह्यादेखील केल्या. मुकेश हे टेलीकॉम उद्योगात येणार नाहीत, तर अनिल ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल पासून दूर राहतील, असे या करारानुसार ठरले. उद्योग जगतातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार या वाटणीमध्ये अनिल अंबानी यांना ते सर्व काही मिळाले जे त्यांना हवे होते.

सुरूवातीच्या काही वर्षात अनिल अंबानी यांच्यासाठी स्थिती अनुकूल होती. मात्र, काही कालावधीनंतर अनिल अंबानी याच्या अधोगतीला सुरूवात झाली. जाणकारांच्या मते अनिल कौटुंबिक वाटणीनंतर ताबडतोब मोठ्या प्रमाणात पैसा लागणार्‍या योजना हाती घेऊ लागले. अनिल अंबानी यांचे प्रत्येक उद्योग निर्णय हे महत्वकांक्षेने घेण्यात आले होते.

याशिवाय त्यांना स्पर्धेत कोणत्याही रणनितीशिवाय उडी मारण्याची सवय होती. तसेच अनिल अंबानी यांच्यासाठी 2008 ची जागतिक मंदी मोठा धक्का देणारी ठरली. एका अंदाजानुसार या मंदीमध्ये अनिल अंबानी यांना 31 अरब डॉलरचे नुकसान झाले. यानंतर अनिल अंबानी ज्या उद्योगात उतरले, तेथे त्यांच्या हाती निराशाच आली. तर मुकेश अंबानी लागोपाठ यशाच्या शिखरावर जात होते.

आज मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आहेत. तर अनिल अंबानी यांच्यावर 45 हजार करोडचे कर्ज आणि खटल्यांचा डोंगर आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी यांना स्वीडनची कंपनी एरिक्सनने 550 करोड रुपये देण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी हे पैसे दिले नाहीत तर त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असे म्हटले होते. मुकेश अंबानी अशा संकटात आपल्या भावाच्या मदतीला धावून आले आणि पैसे भरून त्यांनी भावाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले.

आता लंडन कोर्टाने चीनच्या बँकांच्या अर्जावर सुनवाणी करताना अनिल अंबानी यांच्याकडून 10 करोड डॉलर जमा करण्यास सांगितले आहे. यासाठी कोर्टाने अनिल अंबानी यांना सहा आठवड्याचा कालावधी दिला आहे. आता हे पैसे अनिल अंबानी कसे जमा करतात हे महत्वाचे आहे.