Coronavirus : ‘कोरोना’चा रुग्ण आढळल्यानं विमानातून 289 प्रवाशांना उतरवलं, प्रवाशांचा जीव टांगणीला !

कोची : वृत्तसंस्था – कोचीहून दुबईला जाणाऱ्या विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याने विमानातील सर्व 289 प्रवाशांना उतरवण्यात आले. विमानात कोरोनाचा रुग्ण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उड्डाण होण्यापूर्वीच प्रवाशांना विमानातून उतरवले गेले. या विमानातील ब्रिटनच्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झालीय. तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. विमानात कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला.

केरळमध्ये 19 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी आला होता. त्यातीलच हा एक प्रवासी आहे. ज्याला कोरोनाची लागण झाली आहे तो ब्रिटनचा नागरिक केरळमधील मुन्नार येथे पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आला होता. मुन्नारमधील एका रिसॉर्टमध्ये तो थांबला होता. कोरोनाच्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. मुन्नारमध्ये काहीही माहिती न देताच तो कोची विमानतळावर ग्रुपला जाऊन भेटला. तो दुबईला जाणाऱ्या विमानात असल्याची माहिती मुन्नार प्रशासनाला मिळाली. त्यांनी कोची विमानतळाला ही माहिती कळवली. कोची विमानतळाला ही माहिती मिळताच त्यांनी प्रथम सुरक्षितेच्या दृष्टीने 19 जणांच्या ग्रुपला विमानातून उतरवले. तसेच त्यांच्यासोबत विमानातील 270 प्रवाशांनाही उतरवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भारत टॉपवर
कोरोनाचा जगभरातील 115 पेक्षा अधिक देशामध्ये प्रादुर्भाव झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भारत तत्परतेने पाऊले उचलत आहे. मात्र, पाकिस्तानने चिनमधील आपल्या नागरिकांची कोणतीच दक्षता अद्याप घेतलेली नाही. भारताने चीनमधील आपल्या सर्व नागरिकांना मायदेशात आणले आहे.