भारतात आणला जाऊ शकणार नाही अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार टायगर हनीफ, ब्रिटननं दिला नकार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार हनीफ टायगरला भारताकडे सुपूर्द करण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवायांचा कट रचणे आदीसंह इतर प्रकरणामध्ये हनीफ टायगर आरोपी आहे. भारत सरकारने ब्रिटनला टायगरच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली होती. गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे सांगून हनिफला भारताच्या हवाली करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु भारताची मागणी फेटाळून लावल्याची माहिती ब्रिटनच्या गृह विभागाने दिली आहे.

हनीफला 2010 मध्ये ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती. भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. भारतीय अधिकाऱ्यांनी प्रत्यार्पण वॉरंटही मिळवले. मात्र, हनीफने त्याविरोधात कोर्टात धाव घेतली. हनीफची याचिका कर्टाने 2013 मध्ये फेटाळली. त्यानंतर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहसचिवांकडे गेले. अनेक वर्षे सुनावणी झाल्यानंतर 2019 मध्ये हनीफच्या प्रत्यापर्णला ब्रिटनने नकार दिला. ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे नेते साजित जावेद यांनी हनीफला भारतात सोपवण्याच्या प्रस्तावाला आडकाठी केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

भारत सरकार पुन्हा एकदा ब्रिटन सरकारकडे हनीफ टायगरच्या प्रत्यार्पणाची मागणी करू शकतो. मात्र, या दरम्यान, हनीफ स्थानिक कोर्टात जामीन अर्ज दाखल करू शकतो. हनीफ टायगरला हनीफ मोम्मद उमेरजी पटेल यान नावाने ओळखले जाते. गुजरातमधील सूरतमध्ये 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीशी त्याचे संबंध असल्याची चर्चा आहे.