Coronavirus : ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ब्रिटन भारतीय डॉक्टरांवर अवलंबून, Visa चा कालावधी वाढवला

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. ब्रिटनमधील कोरोनाबाधितांची संख्या 25 हजारापेक्षा अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या 1789 वर पोहचली आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये एका दिवसात या संसर्गामुळे 381 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना ब्रिटनने भारतीय आणि इतर देशातील डॉक्टरांचा व्हिसा कालावधी एक वर्षासाठी वाढवला आहे. ब्रिटनमध्ये वर्क व्हिसावर काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरचा व्हासाचा कालावधी एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (NHC) मध्ये भारतीय आणि इतर देशांतील डॉक्टर काम करत आहेत. ब्रिटनचे गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, 2800 प्रवासी डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. या सर्वांचा व्हिसाचा कालावधी ऑक्टोंबरपूर्वी समाप्त होणार होता.

प्रिती पटेल यांनी पुढे सांगितले की, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एनएचएसच्या प्रयत्नात जगभरातील वैद्यकीय कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. व्हिसाचा कालावधी संपणार असल्याच्या विचाराने त्यांचे लक्ष विचलीत होऊ नये अशी आपली इच्छा आहे. म्हणूनच या सर्वांचा व्हिसा कालावधी वाढवण्यात आला आहे. व्हिसा कालावधी वाढवताना कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. याचा फायदा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील होणार आहे. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, या निर्णयावरून एनएचएसमध्ये कार्यरत असणारे ब्रिटनसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सिद्ध होते.

ब्रिटीश खासदार वीरेंद्र शर्मांची कोरोनावर मात
मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची थोडी लक्षण दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले होते. मात्र, प्रकृती खालावली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शर्मा म्हणाले, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या किरकोळ लक्षणामुळे माझी प्रकृती अधिकच खराब झाली आणि मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून मी घरी आलो आहे. तसेच मी क्वारंटाईनमध्ये आहे. रुग्णालयात असताना जागतिक आरोग्य सेवा आणि सरकारने आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे मला कोरोनावर मात करता आली. तसेच सर्वांनी सरकारने आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.