पक्ष बदलला तरी ‘दोस्ती’ कायम ! उदयनराजेंची शशिकांत शिंदेंना ‘जादू की झप्पी’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन : माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या दोस्तीची चर्चा पूर्ण साताऱ्यात होत असते. मात्र शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंच्या पराभवासाठी पक्षनिष्ठेमुळे जोरदार प्रयत्न केले होते. तर कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. निवडणुकांच्या या लढाईत ज्यांच्या दोस्तीची चर्चा महाराष्ट्र्भर होत असते तेच एकमेकांच्या विरोधात जाऊन बंड पुकारत असल्याचे सगळ्यांनी पाहिले. दोन्हीही आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहून लढत होते यावरून त्यांच्या पक्षनिष्ठेच्या चर्चांना देखील उधाण आले होते. एकूणच ‘दोस्त दोस्त ना रहा’ अशी परिस्थिती होती परंतु आता जादूच्या झप्पी मुळे दोन्ही दोस्त पुन्हा सगळं विसरून एकत्र आले.

खरतर या दोस्तीला तडा जाण्याचे मूळ कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणे. त्या वेळेस शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंची भरपूर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, उदयनराजेंनी मित्राचं ऐकलं नाही. त्यामुळे निवडणूक काळात हे सख्खे मित्र पक्के वैरी बनले. यातूनच दोघांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला परंतु दोघेही अपयशी ठरले आणि पराभवाचा सामना हा दोघांना करावा लागला. उदयनराजे खासदारकीला पराभूत झाले तर शशिकांत शिंदे आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले.

निवडणुकीच्या दीड महिन्यानंतर, शेंद्रे येथील एका लग्न सोहळ्यात दोघे मित्र आमनेसामने आले आणि निवडणुकीतील ही दुश्मनी एक जादूच्या झप्पीने म्हणजेच एका मिठीत दूर झाली. अखेर मैत्री जिंकली आणि आपल्या निस्वार्थ मैत्रीमुळे समोरासमोर आल्याने या दोघांचेही डोळे पाणावले. हे सगळ्यांनी पाहिले आणि या निस्वार्थ मैत्रीची चर्चा अख्ख्या गावकुसात रंगली.

विशेष म्हणजे उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंना मिठी मारत, ”आता सोडणार नाही” असेही उद्गार काढले. या भेटीमुळे राजकीय दुश्मनीपेक्षा पुन्हा मैत्रीच श्रेष्ठ असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. यांची मैत्रीची चर्चा आता पुन्हा रंगली असून दोन्ही नेत्यांची गळाभेट सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना मैत्री जपण्याचा आदर्श घालून देणारी आहे. यापुढील राजकीय समीकरणं देखील या मैत्रीने बदलतात का हे पाहणे आता विशेष असणार आहे.

Visit : Policenama.com