उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन ससून रुग्णालयातील बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याला ससूनमधील डॉक्टरांनी विरोध केला आहे. पुरेशे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. आधी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात त्यानंतर बेड्सची संख्या वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आमच्या मागण्यांचा शनिवारी (दि. 17) सकाळी 9 पर्यंत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर उद्यापासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने दिला आहे. मात्र काम बंदचा इशारा देतानाच कोरोना वॉर्डसह तातडीच्या कोणत्याही सेवेवर परिणाम होऊ देणार नसल्याचे मार्डतर्फे सांगण्यात आले आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णलयातील बेड्स वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याच धर्तीवर ससूनमधील बेड्स वाढवण्याचा निर्णय प्रशासनानेे घेतला आहे. याबाबत मार्डचे सचिव ज्ञानेश्वर जामकर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आम्ही रुग्णसेवेचे काम करत आहोत. सध्या ससूनमध्ये 550 कोरोना रुग्ण आणि 450 इतर रुग्ण आहेत. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ 450 आहे. आणखी 300 बेड वाढविले तर किमान 100 डॉक्टरांची गरज भासणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यांच्यापुढेही आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. आमची मनुष्यबळासह इतर आवश्यक सुविधा वाढविण्याची मागणी आहे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर शनिवारपासून (दि 17) तातडीच्या नसलेल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.