घुबडांचा ‘इतिहास’ उलगडला पुणे जिल्ह्यातील पिंगोरीतील ‘उलुक’ महोत्सवात

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – इला फाउंडेशनतर्फे पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक असलेल्या सैनिकांचे गांव म्हणून ओळखले जाणारे पिंगोरी येथील इला हॅबीटेट सेंटर मध्ये दोन दिवसांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. घुबडांबद्दल असलेले गैरसमज आणि जादूटोण्यासाठी होणाऱ्या तस्करी बद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या उलूक महोत्सवाला शालेय विध्यार्थ्यांसह अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक शाळा पक्षी मित्र विविध सामाजिक संस्था तसेच परदेशातील अभ्यासक देखील सहभागी झाले होते.

यावेळी कीर्तन, प्रवचन, कविता, चित्रांचे प्रदर्शन, रांगोळ्या तसेच टाकाऊ वस्तूंमधून घुबडांच्या प्रतिकृती यांसह निशाचर घुबडांची निसर्ग साखळीतील भूमिका अशा विविध उपक्रमातून घुबडांबद्दलचा इतिहास उलघडण्यात आल्याने अनेकांनी आपल्या चेहऱ्यावर तसेच हातावर चित्र काढून घुबड संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी इला फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ सतीश पांडे, राहुल लोणकर, राजकुमार पवार, डॉ सुरुची पांडे, पक्षी मित्र रियाज खान, कय्युम आतार व आदी मान्यवरांनी घुबडाच्या संरक्षणासासह संवर्धनासाठी अनेक शाळा तसेच सामाजिक संस्थेत व्याख्याने दिली होती.

त्यामुळे या महोत्सवाला शालेय विध्यार्थी पालक ग्रामस्थ तसेच स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह धनंजय भुजबळ, ह.भ.प. अशोक महाराज पवार यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपक्रमाची प्रशंशा केली.

घुबड संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा
इला फांउडेशन तर्फे घुबडांवर अनेक वर्षापासून संशोधन सुरु आहे पिंगळा, गव्हाणी घुबड, शिंगळा, मत्स घुबड, रक्तलोचन घुबड, तपकिरी पिंगट वन घुबड, बहिरी घुबड, पट्टेरी घुबड अशा विविध घुबडांच्या रहस्यमय जीवनाच्या आकलनाचा प्रयत्न सुरु असून घुबड संवर्धनासाठी लोकसहभाग तितकाच महत्वाचा असल्याचे मत डॉ. सुरुची पांडे यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धेपोटी दर वर्षी हजारो घुबडांचा बळी

महाराष्ट्रात ३२ प्रकारच्या घुबडांच्या जाती असून रहस्यमय पंखांची चाहूल लागू न देता उडणारी वावरणारी ही घुबडे मानवी हस्तक्षेप आणि बेफिकिरीमुळे पृथ्वी तलावरून लुप्त होत आहेत. तर अंधश्रद्धे पोटी दर वर्षी हजारो घुबडांचा बळी दिला जातो. त्यामुळे घुबडांविषयी समाजात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. असे मत
डॉ.सतीश पांडे (अध्यक्ष – इला फाउंडेशन) यांनी व्यक्त केले.

Visit : policenama.com