दिल्ली हिंसाचार : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजधानीत दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांच्या स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. काललोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितले होते. त्यानंतर तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर खालिदला अटक करण्यात आली आहे.

उमर खालिद याची 31 जुलैला चौकशी केली होती. त्यावेळी त्याचा फोन जप्त करण्यात आला होता. काल उमर खालिद चौकशीसाठी दुपारी एक वाजता पोहचला होता. 11 तासांच्या चौकशीनंतर रात्री त्याला अटक करण्यात आली. पुढील काही दिवसांत दिल्ली पोलिस उमर खालिदच्या विरोधात चार्जशीट दाखल करु शकते. उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केले आहे.

‘11 तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना देत आहेत’, असे म्हटले आहे. खलिदचा परिवार 3 दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झाला. खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दु मासिक चालवायचे. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून त्याने इतिहास या विषयात एमए आणि एम फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे.