उमरगा : पोरानं वडिलांना जाळलं होतं जिवंत, झाली जन्मठेपेची शिक्षा

उमरगा : पोलीसनामा ऑनलाईन –   तीन वर्षापूर्वी मुरुम (ता. उमरगा) येथे पोटच्या मुलाने अंगणात झोपलेल्या जन्मदात्या पित्याला जाळून ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 29) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

धनराज मलकप्पा ढाले असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर मलकप्पा तोटप्पा ढाले (वय70) असे मृत्यू पावलेल्या वडिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम येथील मलकप्पा तोटप्पा ढाले यांचा मुलगा धनराज हा वडिलोपार्जित शेती एक वर्ष कुणाला तरी लावून पैसे देण्याची मागणी करत होता. त्याच्या मागणीला वडिल मलकप्पा विरोध केला होता. त्यामुळे धनराज आई शांताबाई व वडिल मलकाप्पा यांच्यासोबत सतत भांडण करत होता. तसेच तो वडिलांना जाळून मारण्याची सतत धमकी देत होता. 3 एप्रिल 2017 रोजी रात्री मलकप्पा आपल्या राहत्या घरी अंगणात बाजेवर झोपले होते. त्यावेळी आरोपी धनराजने रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.

या आगीत मलकप्पा पूर्णपणे जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शांताबाई ढाले यांच्या फिर्यादीवरून मुरूम पोलीसात धनराज ढाले यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. ए. मोमीन यांच्याकडे तपास दिला होता. श्री. मोमीन व तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. बी. गोबाडे यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते.