उन्हाची तीव्रता वाढतेय ; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. यामुळे काही आजार देखील वाढल्याने प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. उन्हाळ्यात घरच्या घरी स्वत:ची प्रकृती सांभाळ्ण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.

उन्हाळ्यात तहान खूप लागत असल्याने पुरेसे पाणी प्यावे. या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. तसेच प्लास्टिकच्या चप्पल वापरू नयेत. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. डोके आणि डोळ्यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावे. या दिवसांत फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावे. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करते. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणे आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत.

उन्हाळा जास्त असल्याने सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. यास ‘नस्य’ असे म्हटले जाते. या उपायाने डोकं आणि डोळ्यांतील उष्णता शमते. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचे, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. कोल्ड
ड्रिंक्स, आइस्क्रीम, डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावे पाहिजे. कारण हे पदार्थ टीकण्यासाठी काही रसायने टाकली जातात. या पदार्थांमुळे पचनशक्ती बिघडते. शिवाय त्याच्या अतिसेवनामुळे त्वचारोग होतात. कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, जिऱ्याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचे रक्षण होण्यास मदत होते