धक्कादायक ! दाम्पत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहीलं – ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – उमरेड बसस्थानकाजवळ असलेल्या माँ वैष्णोदेवी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या दाम्पत्याने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. राजेश सोहनलाल गुप्ता (६०) आणि संध्या राजेश गुप्ता (५५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, राजेश गुप्ता यांचे नगर परिषदेच्या संताजी जगनाडे व्यावसायिक संकुलात विजय ट्रेडर्स नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना विवाहित मुलगी व अविवाहित विजय नावाचा मुलगा आहे. विजय हा काही कामानिमित्त नागपूरला गेला होता. तर राजेश गुप्ता व संध्या हे दोघेही घरीच होते.

दोन्ही दाम्पत्य अनेक दिवसांपासून आजारी असून, कर्जबाजारी असल्याचीही चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ या आशयाची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे तपासात उघडकीस आले.

तोंडातून आला होता फेस
मुलगा विजय काही कामानिमित्त नागपूरला गेला होता. तेव्हा वडिलांना त्याने फोन केला असता, त्यांनी तो उचलला नाही. घाबरलेल्या विजयने मित्राला फोन करुन घरी जाण्यास सांगितले. मित्राने घरी जाऊन पहले असता दरवाजा उघड होता. त्यावेळी मित्राचे आई-वडील दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस आला होता. त्याने तातडीने पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी मृत्यूदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मुलीसाठीही चिठ्ठी
“आम्ही दोघे स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नका. मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा,” असे म्हणत मृत राजेश यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. तसेच बंद लिफाफ्यात मुलीच्या नावानेही चिठ्ठी सापडली आहे. दरम्यान, या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.