जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामास भारताचा पाठिंबा, अमेरिका-इस्रायलचा विरोध

पोलिसनामा ऑनलाईन – कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर भारताने बहुराष्ट्रीय सहकार्याच्या बाजूने मतदान केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामास मान्यता दिली आहे. ‘कोविड 19 महासाथीला सर्वंकष व समन्वित प्रतिसाद’ या विषयावरील ठरावास आमसभेच्या 193 देशांपैकी 169 देशांनी मतदानाद्वारे पाठिंबा दिला. अमेरिका व इस्रायल यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले असून हंगेरी व युक्रेन हे तटस्थ राहिले आहेत.

भारताचे दूतावास उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी सांगितले, की सर्वंकष ठरावाला भारताने पाठिंबा दिला असून सर्व पातळ्यांवर बहुराष्ट्रीय सहकार्याला अनुकूलता दर्शवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या कामाचेही कौतुक केले आहे. अफगाणिस्तानचे राजदूत अदेला राझ व क्रोएशियन राजदूत इव्हान सिमोनोव्हिक हे या ठरावाचे सहसादरकर्ते होते. आमसभेत कोविड साथीनंतर संमत झालेला हा तिसरा ठराव आहे. आतापर्यंत जगात कोविडने 9 लाख बळी घेतले आहेत, तर 2.83 कोटी लोक बाधित झाले आहेत. आमसभेचे अध्यक्ष तिजानी महंमद बाँदे यांनी सांगितले,की हा सर्वंकष ठराव सर्व सदस्यांची सामूहिकइच्छाशक्ती दाखवणारा असून कोरोनाच्या विरोधात एकजूट महत्त्वाची आहे.

सदस्य देशांनी सर्व देशांना किफायतशीर निदान, औषधोपचार, लशी यात मदत करावी अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.जगात जिथे संघर्ष सुरू आहेत तिथे ताबडतोब शस्त्रसंधी करावी व जीवनावश्यक मदत पोहोचवण्यास मदत करावी, संवाद राजनय सुरू करावा, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे कौतुक करण्यास आमचा आक्षेप आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने करोनाची माहिती लपवली. हा विषाणू चीनमधील वुहानमध्ये पहिल्यांदा सापडला होता, त्यामुळे त्यांनी माहिती देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.