Coronavirus : ‘हंगामी’ आजार बनू शकतो ‘कोरोना’ व्हायरस, अनेक वर्षांपर्यंत राहू शकतो धोका – UN

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातच नव्हे तर जगातील बहुतांश देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. प्रत्येक देशाचा प्रयत्न हाच आहे की, काहीही करून कोरोनाचा वाढता आलेख कमी करता यावा. कोरोनाच्या भितीदरम्यान संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे की कोरोना व्हायरस लवकरच हंगामी आजाराचे (Seasonal Disease) रूप घेऊ शकतो. चीनमध्ये सर्वप्रथम कोरोनाची पहिली केस मिळाल्यानंतर एक वर्ष उलटले तरी शास्त्रज्ञांना या आजाराचे रहस्य उलगडता आलेले नाही. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात सुमारे 2.7 मिलियन लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसवर अभ्यास करत असलेल्या एका तज्ज्ञांच्या टीमने कोविड-19 च्या प्रसारावर माहिती मिळवण्यासाठी हवामान आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला आणि त्याच्यात होणार्‍या प्रभावांची माहिती जमवण्याचा प्रयत्न केला. अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले की, कोरोना व्हायरस आता हंगामी आजाराप्रमाणे पुढील काही वर्षापर्यंत अशाच प्रकारे त्रास देत राहील.

संयुक्त राष्ट्रच्या ’जागतिक हवामान संघटने’द्वारे गठित 16-सदस्यीय टीमने सांगितले की, श्वासासंबंधी संसर्ग नेहमी हंगामी असतो. कोरोना व्हायरस सुद्धा हवामान आणि तापमान यांच्यानुसार आपला परिणाम दाखवेल. शास्त्रज्ञांच्या टीमने म्हटले की, आतापर्यंत कोरोना व्हायरसवर नियंत्रण करण्यासाठी ज्याप्रकारचे प्रयत्न करण्यात आले आहेत, त्यावर पाणी पडताना दिसत आहे. जर हे अनेक वर्षापर्यंत अशाच प्रकारे कायम राहिले तर कोविड-19 एक मोठा हंगामी आजार बनू शकतो.

डब्ल्यूएचओने दिला इशारा…
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) मागील आठवड्यात जगात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये 10 टक्केच्या दराने वाढ झाली आणि यामध्ये सर्वात जास्त सहभाग अमेरिका आणि युरोपचा राहिला आहे. डब्ल्यूएचओने कोरोना व्हायरस जागतिक महामारीवर बुधवारी प्रकाशित साप्ताहिक आकड्यांमध्ये सांगितले की, जानेवारीच्या सुरूवातीला महामारी आपल्या सर्वोच्च स्तरावर होती आणि सुमारे 50 लाख प्रकरणे प्रति आठवडा येत होती, परंतु फेब्रुवारीच्या मध्यावर यामध्ये घसरण झाली आणि ती 25 लाखांच्या जवळ पोहचली.