आसाराम बापू आश्रमाचे अनधिकृत बांधकाम पालिकेकडून भुईसपाट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिक महापालिकेने गोदावरी नदीच्या पूर रेषे अंतर्गत असलेल्या आसाराम बापू या अनधिकृत आश्रमावर कायदेशीररित्या कारवाई केली आहे .गोदा तीरावर असलेल्या या आश्रमाला सविस्तर नोटीस बजावली होती. परंतु ,आश्रमाकडून कार्यवाही न झाल्याने अखेर पालिकेने कारवाई करत बांधकाम पाडले आहे.

गोदावरी नदीच्या काठावर सावरकर नगर येथे असलेल्या या आश्रमाचे बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली होती. आश्रम प्रशासनाकडून प्रवेशद्वारावर असलेली कमान तसेच अन्य साहित्य हटविले होते मात्र, काही बांधकाम तसेच ठेवत पालिकेच्या नोटिसीला हरताळ फासले होते. यानंतर आज (सोमवारी ) पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. यात अनधिकृत बांधकाम तोडून टाकले आहे. यावेळी आश्रमात जेथे सामान्यांना प्रवेश निषिद्ध होता तेथे देखील पालिकेने कारवाईचा बडगा उगारत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. दरम्यान , पालिकेच्या या बेधडक कारवाईमुळे आश्रमाच्या बाजूलाअसलेल्या मंगल कार्यालय आणि लॉन्सचे अतिक्रमण जमीन मालक स्वतःहून हटवून घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.