दुर्देवी ! पोहण्यासाठी गेलेल्या मामासह 2 IT इंजिनिअर भाच्यांचा बुडून मृत्यू, नगर जिल्हयातील घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मामासह दोन आयटी इंजिनीअर भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपत्रात काल ही घटना घडली.

सुनील तुकाराम वाडेकर (वय 48), भाचा प्रवीण दत्तात्रय फाफाळे (वय 32) आणि सचिन दत्तात्रय फाफाळे (वय-36) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. प्रवीण आणि सचिन दोन्ही भाऊ असून आयटी इंजिनीअर होते.

तिघेजण रविवारी चास शिवारातील मोडवहळ परिसरातील मुळा नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. प्रवीण व सचिन या दोघांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मामा सुनील वाडेकर यांनी प्रयत्न केला. मात्र, तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे चास आणि पिंपळदरी गावांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. घराबाहेर पडू नये असे सरकार आवाहन करत आहे. मात्र, काही लोक गांभार्याने घेताना दिसत नाही आहेत. तिन्ही मामा-भाचे घरातच थांबले असते तर त्याच्यावर मृत्यू ओढावला नसता, अशी चर्चा सुरु आहे.