Nagpur News : बांधकामाच्या वादातून पुतण्याकडून काकाचा निर्घृण खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   बांधकाम सुरु केल्यानंतर जागेचा वाद उकरुन काढत बांधकामास विरोध करत पुण्याने काकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे.

अशोक मेश्राम (वय-) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सारंग युवराज मेश्राम (वय-33 दोघे रा. पंचशील वाचनालयाजवळ, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सारंग हा चिकनच्या दुकानात काम करत होता आणि त्याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षापूर्वी त्याला सोडून गेली आहे. घराचे बांधकाम सुरु होते. त्यावरुन आरोपी आणि मयत अशोक मेश्राम यांच्यात वाद होते.

गुरुवारी सकाळी बांधकाम सुरु होताच सारंगने जागेचा वाद उकरुन काढला आणि बांधकाम करण्यास मनाई केली. यावेळी मयत मेश्राम यांनी आरोपी सारंगला शिवीगाळ करुन त्याचा विरोध मोडून काढला. त्याचा राग मनात ठेऊन आरोपी दिवसभर काकाचा खून करण्याची संधी शोधत होता. मध्यरात्री दारुच्या नशेत आरोपी मेश्राम यांच्या घरात शिरला आणि अर्धवट झोपेत असलेल्या मेश्राम यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटके मारले. यामध्ये गंभीर जखमी होऊन मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस ठाण्याचे किशोर नगराळे, पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी सारंग मेश्राम याला अटक केली. अशोक मेश्राम हा गुन्हेगारी वृत्तीचा होता. 2012 मध्ये त्याने त्याचा भाऊ आणि सारंगचे वडील युवराज मेश्राम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. गुरुवारी सकाळी वाद झाल्यानंतर अशोक मेश्रामने सारंगला धमकी दिली होती. त्यामुळे तो आपल्या जीवाला धोका पोहचवेल या भीतीने त्याचा खून केल्याची कबुली आरोपी सारंगने पोलिसांकडे दिली.