मुंबईतून गावी आलेल्या काका-पुतण्याचा घोडनदीत बुडून मृत्यु

पुणे : मुंबईतील कोरोनाची वाढता प्रसार पाहून मुंबईहून गावी आलेल्या काका -पुतण्याचा घोडनदीत पोहताना बुडून मृत्यु झाला आहे. नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यु झाला.

उल्हास हिरामण काळे (वय ४२), रोहन राजेंद्र काळे (वय १८) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कोलदरे गावी गुरुवारी दुपारी घडली. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून गावाकडे आलेल्या उल्हास काळे यांना मृत्युने अशा प्रकारे गाठल्याने लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतची माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यांपूर्वी त्यांच्या मुळगावी कोलदरे येथे आले होते. रोहन याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उल्हास काळे यांचा मुंबईत कॉम्प्युटर स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे.

उल्हास काळे हे आपला पुतण्या रोहन काळे याला घेऊन घोडनदीवरील म्हसोबाचा डोह येथे गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी घेऊन गेले. त्यांच्या बरोबर इतर ३ लहान मुलेही होती. उल्हास व रोहन हे पोहण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडु लागले. तेव्हा काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. घरी मोबाईलवरुन फोन करुन त्यांनी ही माहिती दिली. पाठोपाठ गावातून लोक धावत आले. त्यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. खासगी गाडीतून त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या चुलता आणि पुतण्याच्या अपघाती निधनाने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.