मानवनिर्मित अस्वच्छता व प्लास्टिकचा बेफाम वापर आरोग्यासाठी तापदायक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असून त्यांवरील उपचार पद्धती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत असून आता प्रत्येक नागरिकांने या बदलाची दखल घेणे महत्वाचे आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच  मानवनिर्मित अस्वछतेमुळे  मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयरोग, कर्करोग, टीबी हे आजार जगभरात वाढत असून यामध्ये प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची  भर पडली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे  मुख्य इंटेन्सिव्हिस्ट (फीजिशियन) डॉ. भरत जग्यासी सांगतात, “प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. या रसायनाच्या  सेवनामुळे प्रजननक्षम वयात पियुशिका ग्रंथीच्या संतुलनावर आघात होऊन गर्भाशयाच्या आतील आवरणाचा अवाजवी विस्तार (एन्डोमेट्रिओसिस), बीजकोशात फुगलेल्या साबुदाण्या प्रमाणे सॅक होणे (पी.सी.ओ.एस.) असे विकार उत्पन्न होऊन वंध्यत्व येते. ह्या रसायनांमुळे  कर्करोग हृदयविकार, मधुमेह, चरबी वाढणे, स्मृतिभ्रंश, अपस्मार असे विकार होण्याची शक्यता बळावते असे वैद्यकीय संशोधन सांगते.

फेकलेले प्लास्टिक शेवटी मातीतच गाडले जाते. उन्हाने जमीन तापल्यावर यातील विषारी घटक मातील मिसळले जातात आणि त्याच मातीत आपण अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे झाडांच्या मुळातून हे रसायन शोषले जाऊन त्याची हानीकारक शृंखला परत मनुष्याच्या आरोग्याला शह देण्यासाठी तयार होते. प्लास्टिक पाण्यावर तरंगते. त्यामुळे पृथ्वीवर फेकलेल्या प्लास्टिकचा काही भाग मातीतून शेवटी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नद्यांच्या प्रवाहातून समुद्रात जातो. जलचर प्राणि आणि माशांची प्रजनन क्षमता  यामुळे खालावते आणि त्यांच्या शरीरातही ह्या रसायनांचा साठा होऊ लागतो त्यामुळे मासे खाणाऱ्यां नागरिकांना  त्यातून बिस्फिनॉल ए आणि थॅलेट्स हे रसायन पोटात जाण्याचा धोका जगभरात वाढला आहे.

अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणा-या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, याविषयी बोलताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ व्रजेश शहा सांगतात, आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उद्यान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थाची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचका-यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नद्या व नाले या सांडपाणी वाहून नेणा-या गटारे बनली आहेत. कच-याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपल्या घरांची,  गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

प्लस्टिकचा भस्मासुर : 
  • १० लाख प्लास्टिक बॅगचा प्रतिमिनिटाला वापर
  • फक्त १ टक्का प्लास्टिक बॅगचा पुर्नवापर
  • एकूण वापरातील ७९ टक्के प्लास्टिक जमिनीत जाते
  • एका प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यात १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी
  • प्लास्टिकयुक्त पाणी शेतीला दिले गेल्यास त्या भूमीच्या धारणक्षमतेवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम
  • दरवर्षी ८ मिलियन टन प्लास्टिक समुद्रात जाऊन मिळते