धक्कादायक ! करणीच्या संशयातून पुतण्यानं काकाचं ‘शिर’ केलं ‘धडा’ वेगळं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पुतण्याने मित्रांच्या मदतीने काकाचे शिर धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शिळ डायघर परिसरात घडली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून मुख्य आरोपींसह दोघांना अटक केली. तर या गुन्ह्यातील इतर तीनजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पिंपरी गावच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी गवातामध्ये शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह कामगारांना आढळून आला होता. मृतदेहाचे केवळ धडच होते. शीर धडावेगळे करण्यात आल्याने हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचे गूढ निर्माण झाले होते. डायघर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

दरम्यान, याचवेळी पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी काही लोक आले होते. त्यांना मृतदेह दाखवला असता त्यांनी हा मृतदेह विष्णू किसन नागरे (वय-45) याचा असल्याचे सांगितले.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली.

घटनास्थळावर वावर कोणाचा होता, याबाबत लोकेशन पोलिसांनी काढले. यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. मयत विष्णू राहत असलेल्या परिसरात चौकशी केली. त्यावेळी याच परिसरात राहणारा त्यांचा पुतण्या अमित नागरे (वय-19) याच्यावर संशय आल्याने आणि तो रात्रभर घरी आला नसल्याची माहिती मिळाली. अमित पहाटे घरी आला असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी अमितला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अखेर पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तीन वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. काकाने करणी केल्यामुळेच वडिलांचा मृत्यू झालाच्या संशय अमितच्या मनात होता.

यातूनच त्याने काकाचा काटा काढण्याचा कट रचला. मित्रांच्या मतदतीने काकावर धारदार शस्त्राने वार करून शिर धडावेगळे केले. शिर धडावेगळे करुन ते दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडवर फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like