Scrappage Policy बाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा ! जुन्या वाहनांच्या मालकांचा होणार फायदा ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे जुने वाहन असलेल्या मालकांना दिलासा मिळणार आहे. वाहन स्क्रपेज पाॅलिसीअंतर्गत जुन्या वाहनांचे जे मालक रिसायक्लिंग प्रोग्रॅममध्ये भाग घेतील त्यांना टॅक्समध्ये सूट मिळणार आहे. सध्या रस्त्यावर लाखो वाहने अशी आहेत त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे हवेचे प्रदूषण होते. हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण पसरवणाऱ्या ट्रक, कार आणि बसेसना रस्त्यावरुन हटवणे हा प्रमुख उद्देश स्क्रॅपेज पॉलिसीचा आहे.

नवीन कार खरेदीवर कर सवलत
नितीन गडकरींनी संसदेत सांगितले की, वैयक्तिक वापरासाठीच्या नवीन कारसाठी 25 टक्के तर व्यावसायिक वापरासाठी 15 टक्के रोड टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे. या शिवाय जो व्यक्ती आपली जुनी कार स्क्रॅप करुन, नवीन कार खरेदी करेल त्याला नव्या कार खरेदीवर 5 टक्के सूट देण्याचे ऑटो कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. याशिवाय नवीन वाहनांसाठी रजिस्ट्रेश फी माफ करणे आणि जुन्या कारसाठी एक स्क्रॅप मूल्य निर्धारित करणे याचा समावेश असणार आहे. जे नव्या मॉडेलच्या किमतीच्या कमीत कमी चार टक्के आहे. जुनी कार स्क्रॅप करुन नवी कार घेण्याची तयारी दाखवणाऱ्या ग्राहकांसाठी ही घोषणा असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

जुन्या गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या वाहनांना स्वेच्छेने स्क्रॅप करण्याचे धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार खासगी वाहनं स्क्रॅप करण्याची मर्यादा 20 तर व्यावसायिक वाहनांना स्क्रॅप करण्याची मर्यादा 15 वर्षे करण्यात आली आहे. 20 वर्षाहून अधिक जून्या गाड्या आणि 15 वर्षाहून अधिक व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट टेस्ट आवश्यक आहे.15 वर्षापेक्षा अधिक जुन्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी अनेक पटीने पैसे भरावे लागणार आहेत.

प्रदूषण चाचणी करणे बंधनकारक
नव्या वाहनांना सवलती देताना प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि अन्य शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. जून्या वाहनांना फिटनेस आणि प्रदूषण चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी देशामध्ये सेल्फ ड्राईव्ह फिटनेस सेंटरची आवश्यकता असून त्या दृष्टीने काम सुरु असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.