कोरोनाग्रस्त अरुण गवळीच्या प्रकृती बाबत धक्कादायक माहिती समोर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती खालावली आहे. अरुण गवळीची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आज (शुक्रवार) सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात 2012 साली गवळीसह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अरुण गवळीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे मागील चार दिवसांपासून त्याच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार सुरु होते. मात्र, त्याची प्रकृती जास्तच खालावल्यामुळे त्याला शुक्रवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गवळीवर मेडिकलमध्ये उपचार करायचे की इस्पितळात उपचार करायचे यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे.

मागील दोन ते तीन दिवसापासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अरुण गवळीसह इतर कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अरुण गवळी याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर तुरुंग प्रशासनाने इतर कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत अरुण गवळी याच्यावर उपचार सुरु आहेत.